History Cover Image

शिकलगार सहकारी पतपेढी लि.

Welcomeमुंबईत दादर येथे 1967 साली एका बँकेची स्थापना झाली. या बँकेच्या कार्यकारी मंडळात श्री अब्दुल अजीज अब्दुल करीम शिकलगार यांचा समावेश होता. बँकेची सदस्य संख्या जास्तीत जास्त वाढवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र ते फारसे यशस्वी झाले नाहीत. सदस्य संख्या कमी असल्यामुळे त्यांचे विचार आणि मत विचारात घेतले जात नव्हते म्हणून शिकलगार समाजासाठी एक वेगळी बँक स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. श्री अब्दुल अजीज अब्दुल करीम शिकलगार (लालबाग - विटा), श्री जमाल दादुमिया शिकलगार (दो टाकी - विटा), श्री हाजी निजामभाई इब्राहिम शिकलगार (दो टाकी - विटा), श्री रसुलभाई अब्बास शिकलगार (ग्रँट रोड - भाळवणी), श्री हाजी अहमदभाई मीराभाई शिकलगार (डोंगरी - विटा), श्री मुबारक चांद शिकलगार आणि श्री पापा अलीसाहेब शिकलगार (मुलुंड - कुर्ला) हे सर्वजण एकत्र आले आणि प्रत्येकी 10 रुपये वर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली. बँकेची सदस्य संख्या जास्तीत जास्त वाढवणे हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते.

1977 मध्ये बँकेची सदस्य संख्या 125 पर्यंत वाढली, तेव्हा 11 ऑगस्ट 1977 रोजी मोठ्या थाटामाटात शिकलगार सहकारी पतपेढी मर्यादित (नोंदणी क्रमांक: BOM| RSR |841 | 1977) ची स्थापना केली. पतपेढीची स्थापना झाली आणि तिचे काम वेगाने सुरु झाले. एकामागून एक वर्षे गेली. बँकिंग क्षेत्रात बदलत्या प्रक्रियेबद्दल माहितीचा अभाव, कमी कर्मचारी वर्ग आणि वेळेचे व्यवस्थापन नसल्यामुळे पतपेढीचे कामकाज कोलमडू लागले. 1998 मध्ये कै. श्री हाजी मौलाभाई हसन शिकलगार (कुर्ला आणि कचरेवाडी) यांनी शिकलगार सहकारी पतपेढीची पुढची सूत्रे हाती घेतली. ते एक सज्जन आणि नि:स्वार्थी व्यक्ती होते. त्यांना केवळ शिकलगार समाजाचं भलं करायचं होतं. कुर्ल्यात त्यांचा भरभराटीचा व्यवसाय होता आणि कुर्ल्यात सर्वजण त्यांना मान देत होते. सुरुवातीला त्यांनी स्वत:च्या जागेत पतपेढी चालवून आपले योगदान दिले. त्यानंतर जागेसाठी नाममात्र भाडे घेतले. त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. परंतु या प्रयत्नांमुळे शिकलगारांमध्ये त्यांची चांगली ओळख झाली. 1998 ते 2003 हा त्यांचा कार्यकाळ होता. या काळात सहकारी पतपेढीचे नाम कुर्ल्यात लोकप्रिय झाले. श्री जावेद बुरहान शिकलगार हे पतपेढीचे प्रभारी होते. ॲड. जावेद बुरहान शिकलगर हे सध्या खारघर मध्ये राहतात. त्यांची स्वत:ची फर्म आहे. पतपेढीतील जावेद यांचे योगदान उल्लेखनीय होते. ते एक उत्तम वक्ते होते. सकारात्मक विचारांनी त्यांनी पतपेढी चालवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला.

त्यानंतर पुढे 2003 ते 2008 या काळात श्री. अमीन भाई इब्राहिम शिकलगार (दो टाकी) यांनी पतपेढीची सूत्रे हाती घेतली. ते अध्यक्ष होते आणि कै. मौलाभाई हसन शिकलगार उपाध्यक्ष होते. कै. हाजी इब्राहिम जांगू शिकलगार कोषाध्यक्ष होते. या संचालक मंडळाने झोपडपट्टी परिसरात जमीन खरेदीची रिस्क घेण्याचा विचारही केला. मात्र दुर्दैवाने ती जागा बँकिंग कामकाजासाठी योग्य नव्हती. तो विचार त्यांना सोडून द्यावा लागला. 2008 मध्ये नवीन सदस्य संचालक मंडळावर निवडून आले. ज्येष्ठ सदस्यांना वाटले की, नवीन पिढीने पुढे यावे आणि सर्वांच्या संमतीने श्री. नौशाद याकूब शिकलगार (गोरेगाव) यांची अध्यक्ष पदी निवड झाली.

श्री. नौशाद याकूब शिकलगार, एक तरुण, सुशिक्षित व्यक्ती होते. ज्यांना तेव्हा निर्धारित ध्येय साध्य करण्याची तसेच समाजासाठी जोखीम पत्करण्याची तीव्र इच्छा होती. समाजासाठी त्यांची काही स्वप्न होती, एक दृष्टीकोन होता. ते पूर्णपणे निस्वार्थी आणि प्रामाणिक होते. वडिलांकडून त्यांच्यापर्यंत आलेली क्षमता सिद्ध करणे हेच त्यांचे एकमेव ध्येय होते.

हेच उद्दिष्ट समोर ठेवत, त्यांनी शिकलगार जमात ट्रस्टच्या प्रमाणे शिकलगार सहकारी पतपेढीची टीम तयार केली ज्यात प्रामाणिक, निस्वार्थी आणि समाजाला मदत करण्याची इच्छा असलेल्या सदस्यांची निवड केली. ज्यानी आपले कार्यालयीन काम किंवा वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की श्री. नौशाद शिकलगार यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पतपेढी हळूहळू, टप्प्याटप्प्याने भरभराटीला येऊ लागली. त्यांची स्वप्ने साकार झाली. ती प्रत्यक्षात उतरली. पतपेढीचे कामकाज पद्धतशीर पणे सुरू झाले. पतपेढीने कोणत्याही इतर वित्तीय संस्थे कडून कोणते ही कर्ज न घेता खूप प्रगती केली आहे. पतपेढीचा आपोआप विस्तार झाला. आज शिकलगार सहकारी पतपेढीच्या गोवंडी आणि गोरेगाव येथे 2 शाखा आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि एक समर्पित टीम आहे. अशा प्रकारे पतपेढी रोजगार पुरवण्यात महत्त्वपूर्ण ठरली आहे. शिकलगार सहकारी पतपेढीमुळे अनेक लहान आणि मोठे व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवू शकले आहेत. अनेकांनी मुंबई तसेच उपनगरां मध्ये आपले स्वप्नातील घर घेतले आहे. व्यापारी, व्यावसायिक यांनी ही कर्ज घेऊन भरभराट केली आहे. पतपेढीने वेळेवर दिलेल्या पाठिंब्यामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांची लग्ने थाटामाटात आणि उत्साहात यशस्वी रित्या पार पाडली आहेत.

Welcome
तसेच पतपेढीने प्रकृती अस्वस्थ असलेल्या अनेक लोकांना त्यांचे आरोग्य परत मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. शिकलगर सहकारी पतपेढी शिकलगार समाजाचा कणा आहे. ती आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि मजबूत आहे. तिने या स्पर्धात्मक बाजारात गरुडझेप घेतली आहे. श्री. नौशाद याकूब शिकलगार यांच्या नेतृत्वाखाली सक्षम मार्गदर्शना खाली पतपेढीने आपली क्षमता सिद्ध केली आहे. आता चेम्बूर येथे पतपेढीने नवीन कार्यालय खरेदी केले आहे. बी' 12, कास्तुरबा नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, दुसरा मजला, ठक्कर बाप्पा कॉलनी, चेंबूर मुंबई-71 येथे हे कार्यालय आहे. सध्या बांधकाम सुरू असल्यामुळे कार्यालय तात्पुरते स्थलांतरीत केले आहे.